दुचाकी मोटार सायकल ( बाईक ) चालकांनो सावधान…. ! बाईक चालवताना हेल्मेट चा वापर करा अन्यथा कारवाई अटळ अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखे कडून २९ मार्च पासून विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) बाईक स्वारांनी बाईक चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या मुळे अनेकांना आपला अनमोल जीव गमवावा लागत आहे. अपघातांमुळे कित्येक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्या मुळे रायगड वाहतूक पोलीसांकडून रविवार दिनांक २९/०३/२०२६ पासुन संपूर्ण जिल्ह्यात विना हेल्मेट कारवाई अभियान राबविण्यात येणार आहे.रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणुन प्रसिध्द आहे. सद्या शनिवार व रविवार तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या वेळी रायगड जिल्हयात पर्यटनाकरीता येणारे काही पर्यटक हे आपली दुचाकी घेवुन फिरण्यासाठी येत असतात. तसेच जिल्हयातील स्थानिक नागरीक देखील मोठया प्रमाणात हेल्मेटचा वापर न करता प्रवास करत असतात. मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांनी महाराष्ट्रातील फेटल अपघाताची संख्या २० टक्क्यांनी कमी करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. रायगड जिल्हयातील फेटल अपघातांचा आढावा घेतला असता मोटार अपघातात मयत झालेल्या इसमांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये हेल्मेटचा वापर न करता डोक्यास मार लागुन मयत झाल्याची संख्या पुढील प्रमाणे आहे. रायगड मध्ये २०२४ मध्ये ११०,२०२५ मध्ये १०४ तर फेब्रुवारी २०२६ पर्यंत २२ मयत झाले आहेत मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई, मा. पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग, मा. अपर पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग यांनी दिलेल्या सुचनां प्रमाणे रायगड जिल्हयातील फेटल अपघातामध्ये मृत्युचे प्रमाण कमी व्हावे याकरीता जिल्हा वाहतुक शाखा, रायगड अलिबाग येथून रविवार दिनांक २९/०३/२०२६ पासुन विना हेल्मेट कारवाई अभियान राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमे अंतर्गत संपुर्ण जिल्हयात विशेषतः हायवे महामार्गावर कारवाई करण्यात येणार आहे. तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण मोटार सायकलचा वापर करताना मोटार सायकलस्वार व त्यामागे बसणा-या इसमांनी हेल्मेट परिधान करावे. परंतु ब-याच स्थानिक नागरीक हे कमी अंतराकरीता जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये असा आग्रह असतो. परंतु अपघात हा अंतर लांब किंवा जवळचे आहे हे पाहुन होत नाही. त्याकरीता अंतर कीतीही असो सर्व नागरीकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांच्या कडून करण्यात आले आहे.



