विकास कॉलनी शाळेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड. ) शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ रोजी रा.जि.प. शाळा विकास कॉलनी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उतेखोल केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन बामुगडे, माजी विद्यार्थी अमोल जंगम, योगेश तेंडुलकर, राजेंद्र कोळवणकर ,भुतकर,राखी चिनके, शाळा समिती व पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल व सुमधुर आवाजात ईशस्तवन ,स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. आलेल्या मान्यवरांचे शाळेकडून स्वागत व सत्कार करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुर्वा येलवे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेचा सर्वांगिण गुणवत्ता विकास होण्यासाठी माजी विद्यार्थी संघ महत्त्वाची भूमिका बजावत असतो हे स्पष्ट केले. त्यानंतर शाळेच्या आजी विद्यार्थी इयत्ता चौथी स्वरा प्रभाकर मसुरे या विद्यार्थिनींने इंग्रजी मधून आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर इयत्ता चौथीतील निशिता निलेश पालवणकर, महेश अनिल पाटील, प्रज्ञा अमीर केकाणे इयत्ता तिसरी या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यां विषयी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नितीन बामुगडे यांनी आपल्या मनोगतात आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जाग्या केल्या व सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांचे मनोगत ऐकून आपल्या मराठी शाळेतील मुले देखील कुठेही कमी नाहीत हे त्यांनी सांगितले. तदनंतर उतेखोल केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांनी माजी विद्यार्थी संघटनेची गरज का असते, या संघाचा उद्देश काय आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपली शाळा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”या स्पर्धेत आहे याबाबतीत कल्पना दिली. यावेळी १९९० च्या बॅचने शाळेला कॉम्प्युटर व प्रिंटर भेट दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या सहशिक्षिका निलम गायकवाड यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली.



